सिंधुताई सपकाळ (माई) यांची मुलाखत
प्रश्न . माई आयुष्यात इतकं सोसलंय तू, इतक्या अडचणींना सामोरं गेलीयेस तरीही देवावरचा तुझा हा विश्वास अजूनही टिकून कसा ?
उत्तर. कोणावरतरी विश्वास ठेवायचाच आहे ना, मग 'कोणावरही' विश्वास ठेवण्यापेक्षा देवावर विश्वास ठेवलेला कधीही बरा. त्याने संकटं आणले म्हणून तर मी मोठी झाली. अरे संकटांना हसत खेळत वेलकम म्हणायचं . मी एक गोष्ट वाचली होती बेटा, एक भक्त देवाला सतत सांगायचा कि तू नेहमी माझ्या सोबत असायला पाहिजे, देव म्हणाला राहील मी तुझ्यासोबत. मग भक्त म्हणाला, 'अरे पण मी कस ओळखायचं, तू माझ्यासोबत आहेस कि नाही ते?' देव त्याला म्हणाला, 'जीवनाच्या वाटेवर चालताना तुला मी तुझ्यासोबत आहे कि नाही याबाबत शंका वाटायला लागली, कि फक्त मागे वळून बघ. तुला नेहमी दोन पावलांऐवजी चार पावलं उमटलेली दिसतील.' ठरलं मग. निघाला भक्त आणि वाटेत संकट आलं त्याच्यावर. त्याने मागे वळून खात्री केली, देव खरंच माझ्याबरोबर आहे कि नाहि. त्याला चार पावलं दिसली, मग तो म्हणाला, 'क्या बात है, भगवान मेरे साथ है'. पुढे गेल्यावर त्याच्यावर एक अजुनहि मोठं संकट आलं. त्यात तो थकला, पूर्णपणे गर्भगळित झाला. मग त्याला डाउट आला, अरे हा देव मला सोडून तर नाही ना गेला. त्याने मागे वळून पाहिलं, दोनच पावलं उमटत होते. त्याला राग आला, येऊन देवाशी कडाकडा भांडला. 'तू देव आहे कि काय रे, तुला देव कस म्हणायचं . माझ्यावर जेव्हा मोठं संकट आलं तेव्हा तू माझ्या सोबत नव्हता.' देव म्हणाला, 'चूकतोयेस तू .' भक्त म्हणाला, 'कस?'
'तू मागे वळून पाहिलंय.'
'हो'
'किती पावलं दिसली तुला?'
'दोन '
'बरोबर आहे मग' .
'कसकाय बरोबर आहे!'
'अरे त्यावेळेस मी तुला खांद्यावर घेतलं होत! पाऊल दोनच उमटतील कि नाही !'
त्याच नाव देव आहे बेटा. संकटकाळी तो त्याच्या खांद्यावर घेऊन आपल्याला पुढे नेतो.
प्रश्न . माई जर या जगातील कोणतीही एक गोष्ट बदलण्याची तुला संधी मिळाली तर ती कोणती राहील?
उत्तर. आख्ख्या जगाच दुःख नष्ट करून टाकेल मी! सुखाचा सागर वाहायला पाहिजे सगळीकडे. दुःखच नको बेटा. पण दुःख सोसल्याशिवाय सुखाची गोडी पण नाही कळणार रे. त्यामुळे ते 'फिफ्टी-फिफ्टी'!
प्रश्न . माई, सिंधी ते सिंधुताई या तुझ्या प्रवासात तू अनेक अडथळ्यांना सामोर गेलीस. या सर्व अडथळ्यांना, अडचणींना समोर जाण्याची ताकद तुला कुठून मिळाली ?
उत्तर. भुकेने दिली बेटा . मी जळगाव स्टेशन वर भीक मागत होते, तुमच्या कोपरगाव स्टेशन वर भीक मागितलीये, मनमाड स्टेशन वर भीक मागितलीये. मला भिक्षा मिळाली कि मी भिकाऱ्यांना खायला द्यायचे. मला शक्यतो जास्त भीक मिळायची. वीसच वर्षांची होती रे. आता बहात्तर वर्षांची आहे . भिकाऱ्यांना खायला दिल कि भिकारी मला संरक्षण द्यायचे. भिकार्यांमधली मानवता मी जवळून पाहिलीये बाळा. भुकेने मला भुकेपर्यंत नेलं.
आणि नंतर लक्ष्य एकच होत, कोणीही भूकेलं राहायला नको... पण एक आहे, ज्यांना मी जेवायला दिल, ते कधी मला सोडून गेले नाहीत, माझ्या सोबत आले आणि संस्था उभी राहिली.
प्रश्न. चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या जीवनप्रवासाकडे मागे वळून बघताना कस वाटल ?
Ans. माझा खरा प्रवास चित्रपटात आलाच नाही, थोडासाच आला. अजून हि प्रवास शिल्लकच आहे. ती सुरुवात होती आयुष्याची, हे जगण आहे. अजूनही खूप काही गोष्टी करायच्या आहेत. अजून हि खूप लढायचं आहे रे बाळा .
प्रश्न. माई तुझ्या जीवनातील असा एक क्षण कि जो तू कधीही विसरू शकत नाही…
उत्तर. एक बाई जी वीस वर्षाची मुलगी आहे, नऊ महिन्यांची गरोदर आहे, एकटी गायीच्या गोठ्यात टाकलेली आहे, तिला गायी संरक्षण देताय. एक गाय तिच्यावर उभी राहून तिला वाचवतेय, सर्व गायी पळताय, ओरडताय पण ती गाय कोणालाही जवळ येऊ देत नाही. तिथे मी माझ्या बाळाला जन्म दिला, त्या बाळाची नाळ मी दगडाने तोडतेय आणि मोजून सोळाव्या दगडाला ती नाळ तुटतेय. असं कधी घडलाय का जगात? स्वतः जन्म दिलेल्या बाळाची नाळ कधी कुठल्या बाईने तोडलय? मी तोडलं बेटा, हि घटना कशी विसरू शकेल मी. आणि जिची नाळ मी दगडाने तोडली, तेच बाळ आज हि पूर्ण संस्था सांभाळतय. आणि तिला मी सांभाळलं नाहीये. माझ्या स्वतःच्या मुलीला मी दुसऱ्यांना सांभाळायला दिल, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट यांना. आणि त्यानंतरच मी दुसऱ्याचं बाळ घेतलं, का... तर माझ्यातली आई चुकू शकते म्हणून. तिला एका पत्रकाराने विचारलं, कि ममता सांग तुला काय व्हायचंय. माझ्या मुलीने सांगितलं मला माझ्या आईची आई व्हायचंय. टेन्शनच गेलं ना. गुन्हेगार आहे मी तिची बेटा, जन्म झाल्या झाल्या दगड मारलाय तिच्या नाळेवर मी. आणि तेच बाळ आज हि पूर्ण संस्था सांभाळतेय यापेक्षा मोठी कामे दुसरी कोणती असू शकते.
प्रश्न . माई अशी कोणती घटना होती कि जिने तुला ममतेच्या वाटेवर चालायला प्रवृत्त केलं ?
उत्तर. स्वतःची मुलगी देताना काळीज तुटलं रे बेटा. काही झालं तरी आई होती ना. माझी मुलगी दिल्यावर मी दुसऱ्यांचे बाळ घ्यायला सुरुवात केली, ती काळजातली रिकामी जागा मी भरून काढली. आईची माया सर्वांना हवीये रे.
प्रश्न. माई तुम्ही तरुणांना जीवन जगताना काय संदेश द्याल?
उत्तर. हे बघ बेटा, तरुणांचं जीवन हे खाचखळगे उभ्या रस्त्याने असतं. हि खाचखळगे, अडीअडचणी, धोक्यांची स्थळ, काटेकुटे हे ओलांडली कि मग खर जीवन कळत. नेहमी एक लक्षात ठेवावं तरुणांनी कि फुलांच्या पायघड्यावरून चालताना काटे बोचले तर ते सहन करायला शिका, कारण त्यांना फक्त बोचणं माहीत असत, वेदना कळत नसतात. तुम्ही पायच एवढे घट्ट करा, कि एक दिवस काटेच तुम्हाला सांगितलं, कि आईये, वेलकम, सुस्वागतम, हम झुकता है तुम चलना सीखो.
The day I interviewed Sindhutai Sapakal |
Comments
Post a Comment